Monday 14 July 2014

दुष्काळाची पूर्वपरीक्षा …… (भाग -१)

          नेहमीच अंदाज चुकवणारा मान्सून आता येण्याची चाहूल देत आहे …  मान्सूनच्या येण्याचे आपण फक्त अंदाजच बांधू शकतो … त्याच्या प्रतिक्षेनंतर आता पाऊस पडेल या आशेवर आपण आहोत ,पण त्याच्या येण्याची खरचं आपली तयारी झाली आहे ???
     "तहान लागल्यावर विहीर खणायची" हि तशी आपली जुनीच सवय , त्याला दुष्काळ तरी कसा अपवाद ठरणार.  येणाऱ्या मान्सूनच  स्वागत करताना जुन्याच गोष्टींचे संदर्भ नव्याने तपासणे खूप निकडीच वाटत..


          -  दत्ता माने


हे चित्र आपल्याला फारस नवीन नाही .

      विकासाच्या रोल मॉडेलकडे वाटचाल करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील  पूर्वेकडील माण , खटाव , सांगोला , आटपाडी या तालुक्यांची कायम दुष्काळी तालुके हि ओळख विकासावर प्रश्न चिन्ह उभे करणारी आहे . कमी पर्जन्यमाना मुळे  जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य हेच ज्वलंत वास्तव या तालुक्यात पहावयास मिळते . या तालुक्यांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याच्या असणाऱ्या पाणी प्रश्नावरून आतापर्यंत निवडणुका लढवणारे आणि पाण्याच्या श्रेयवादावरून एकमेकांना शह देणारे राज्यकर्ते आणि दिशाहीन जनता सातत्याने पडणाऱ्या दुष्काळातून काहीच शिकले नाहीत , आणि जे शिकले अशा भगीरथांची पाटी कोरीच राहिली . गेल्या वर्षीचा साखळी बंधारे बांधण्याचा निर्णय हा शासनाचे " वरातीमागून घोडे " असाच होता .

            दुष्काळावर केवळ उरमोडी , जिहे कठापूर आणि टेंभू . प्रकल्प हाच एकमेव उपाय असल्याचे चित्र गेली काही वर्षे जनतेसमोर उभे केले गेले आहे . या योजना  पाण्यासाठी निश्चित हिताच्या आहेत परंतु या योजनाचा इतिहास आणि भविष्यात संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी याचा विचार करता स्थानिक पातळीवर अन्य जलस्त्रोतांचा विकास करणे  गरजेचे आहे . त्याकरिता या तालुक्यांचे भौगोलिक स्थान उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा  अभ्यास करून   नियोजनबद्ध वापर केल्यास पाण्यासाठीचा संघर्ष निश्चितपणे टाळता येऊ शकतो . परंतु  दुष्काळी भागातील जलसंधारणाचा  धोरणात्मक विचार करण्याची कुठलीही तसदी प्रशासनाने किंवा राज्यकर्त्यांनी घेतली नाही . दुष्काळावरच्या  केलेल्या उपाययोजना या तात्पुरत्या आणि कुचकामी ठरल्या आहेत आणि सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाने जनता त्रस्त आहे . पर्यायाने निधी पाण्यासारखा वाहून गेला आहे . बंधारे बांधत असताना  त्याची जागा , साठवण क्षमता , ओलिता खाली येणारे क्षेत्र , भूगर्भ रचना आणि पाण्याचा प्रभावी वापर   किमान या मुलभूत घटकांचा  तरी विचार होण अपेक्षित होत परंतु साखळी बंधारे बांधताना प्रशासनाने आपली दिवाळखोरीच दाखवली, लोक सहभाग दूरच राहिला . एकूणच दुष्काळ निवारणार्थ केलेल्या या योजनेची परिस्थिती  आंधळ दळतय…… अशीच झाली आहे .
            दुष्काळाचे निवारणार्थ आणि पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी या तालुक्यातील भोगोलिक स्थान  , जल प्रणाली , भूरुपीय विस्तार आणि भूगर्भ यांचा सूक्ष्म अभ्यास करून स्थानिक पातळीवर जल संवर्धन  करून योजना कार्यान्वित करणे गरजेचे वाटते .
      पर्ज्यन्यछायेच्या प्रदेशात येणाऱ्या या  तालुक्यांमध्ये सरासरी ३०० ते ४०० मिमी. पाऊस पडतो . शंभू महादेवाच्या डोंगररांगेतील  सीतामाई , औंध , माहीमानगड , खानापूरचे पठार या मुख्य जलविभाजाकांमुळे येरळा आणि माणगंगा या दोन मुख्य नद्यांच्या खोऱ्यात  हे तालुके विकसित झाले आहेत . परंतु या नद्या बारमाही नसल्यामुळे त्यांचा जल सिंचनासाठी फारसा उपयोग होत नाही . हे आपल्या नियोजनावर लागलेलं सर्वात मोठ्ठ प्रश्न चिन्ह आहे ......